Ad will apear here
Next
विस्फी, एलिस गाय ब्लाचे आणि महिलांचा सिनेमा

‘एलिस गाय ब्लाचे’ ही जगातील पहिली महिला चित्रपटकार. मागील वर्षी तिचा ५०वा स्मृतिदिन गोव्यात ‘विस्फी’ या अनोख्या लघुपट महोत्सवाच्या रूपाने साजरा करण्यात आला. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्तानं या महोत्सवाचे आयोजक किशोर अर्जुन यांची यामागील संकल्पना आणि एलिस गाय ब्लाचे हिची कारकीर्द यांवर प्रकाश टाकणारा अनिरुद्ध प्रभू यांचा हा लेख... 
.............
एलिस गाय ब्लाचेशीर्षकात असलेली दोन्हींही नावं बऱ्याच वाचकांना ठाऊक नसतील अशी शक्यता अधिक आहे. यातलं पहिलं ‘विस्फी’ (वूमन इंटरनॅशनल शॉर्टफिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया) हे एका छोट्या संस्थेचं नाव आहे. ही संस्था लघुपट महोत्सव आयोजित करते आणि दुसरं ‘एलिस गाय ब्लाचे’ हे नाव असणारी व्यक्ती या संस्थेची प्रेरणा आहे. एलिस गाय ब्लाचे कोण होती, हे लक्षात घेता आलं, तर शीर्षकात लिहिलेल्या तीनही नावांचा एकमेकांशी असलेला संबंध आपल्या लक्षात येईल. अर्थात सिनेमा हे इतर दोन नावांमधलं एक महत्त्वाचं माध्यम आहेच; पण त्याशिवाय अजून एक दुवा या दोन्ही नावांना एकमेकांशी जोडतो. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्तानं जगातल्या पहिल्या महिला चित्रपटकार आणि भारतातल्या पहिल्यावहिल्या महिला चित्रपटकारांच्या लघुपट महोत्सवाविषयी सांगणं महत्त्वाचं आहे.

एलिस ही जगातली पहिली महिला चित्रपटकार आहे, हे बऱ्याच लोकांना ठाऊक नाही. १८९६मध्ये तिचा पहिला चित्रपट आला आणि सिनेमाच्या इतिहासानेच इतिहास रचला. तरीही एलिस गाय ब्लाचे हे नाव चित्रपट अभ्यासक सोडून इतरांना ठाऊक असण्याची शक्यता विरळाच. मुळात तिला जाऊन आता ५१ वर्षं होत आहेत. तिचा मृत्यू १९६८मधला; मात्र तिचा शेवटचा चित्रपट १९२१मधला. 

एक जुलै १८७३ रोजी फ्रान्समध्ये एलिसचा जन्म झाला. अमेरिका ही तिची कर्मभूमी राहिली. वयाच्या १४व्या वर्षी एका कॅमेराच्या कंपनीत सेक्रेटरी म्हणून काम करत असताना, चित्रपट बनवणाऱ्यांच्या काही जणांच्या संपर्कात ती आली. तिलाही या सगळ्या गोष्टींची आवड पूर्वीपासूनच होती. याच गोष्टीचा पुढे हळूहळू इतिहास तयार झाला. त्या काळात ल्युमिए बंधू हे एकटेच चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते होते. असे असतानाही १८९६मध्ये एलिसने स्वतःच्या कंपनीच्या साह्याने ‘दी कॅबेज फेअरी (The Cabbages Fairy)’ हा चित्रपट बनवला. हा चित्रपट जगातला पहिला असा चित्रपट होता, जो एका महिलेने दिग्दर्शित केलेला होता. एलिसच्या या चित्रपटाच्या नावे आणखी एक विक्रम होता, तो म्हणजे हा चित्रपट जगातला पहिला नरेटिव्ह चित्रपट होता. 

१८९६ ते १९०६ या काळात एलिस गेमोंत यांच्या कंपनीच्या सिनेविभागाची प्रमुख होती. १९०६मध्ये तिने तत्कालीन सगळ्यात मोठ्या बजेटच्या चित्रपटाची निर्मिती केली. ‘दी लाइफ ऑफ अ ख्रिस्ट (The life of a Christ)’ या बिग बजेट सिनेमात जवळपास तीनशेहून अधिक कलाकार होते. यावरून त्या चित्रपटाच्या विस्ताराची कल्पना येऊ शकते. हा सिनेमा विक्रम करून गेला. या काळात एलिसने भरपूर पैसेही कमावले. पुढे १९०७मध्ये तिने हर्बर्ट ब्लाचे या तरुणाबरोबर लग्न केलं आणि त्याच्या मदतीने ‘सोलेक्स’ नावाची आपली स्वतःची चित्रपट कंपनी आणि स्टुडिओ स्थापन केले.  

अर्थात ‘सोलेक्स’नंही इतिहास रचला. ‘सोलेक्स’ हा हॉलिवूड अस्तित्वात येण्यापूर्वीचा सर्वांत मोठा स्टुडिओ होता. तसेच एलिस हीदेखील स्वतःचा स्टुडिओ चालवणारी पहिली महिला ठरली. या सोलेक्सच्या माध्यमातून एलिसने जवळपास ५००हून अधिक चित्रपट केले; पण तिचं हे यश फार काळ टिकू शकलं नाही. आपल्या पुढील करिअरसाठी १९१८मध्ये हर्बर्ट तिला सोडून गेला आणि तिच्या उताराला सुरुवात झाली. कंपनीला अनेक मोठे तोटे सहन करावे लागले. १९१९मध्ये एलिसने ‘टर्निश्ड रेप्युटेशन (Tarnished Reputations)’ नावाचा चित्रपट तयार केला. पुढे कर्जबाजारी झाल्याने १९२१मध्ये तिला तिचा सोलेक्स स्टुडिओ विकावा लागला. त्यानंतर मात्र तिने एकही चित्रपट केला नाही. १९२२मध्ये अधिकृतरीत्या हर्बर्टपासून विभक्त झाल्यानंतर ती पुन्हा फ्रान्सला निघून गेली. ‘टर्निश्ड रेप्युटेशन’ हा तिचा शेवटचा चित्रपट ठरला. पुढे १९६८मध्ये वयाच्या ९१व्या वर्षी तिचा मृत्यू झाला. अचानकपणे झालेल्या तिच्या मृत्यूची कल्पना अर्ध्याअधिक जगाला नव्हती.

मागील वर्षी पहिल्यांदा ‘विस्फी’ आयोजित करण्यात आला होता. हे वर्ष एलिसचं ५०वं स्मृतीवर्षदेखील होतं. त्याच पार्श्वभूमीवर हे ‘विस्फी’चं आयोजन होतं. ‘विस्फी’ म्हणजे ‘वूमन इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया’ (Women International Short Film Festival of India). हा केवळ महिला दिग्दर्शकांच्या लघुपटांसाठीचा महोत्सव आहे. मागील वर्षी हा महोत्सव गोव्यात आयोजित करण्यात आला होता. किशोर अर्जुन यांनी या महोत्सवाचं आयोजन केलं होतं. केवळ महिला दिग्दर्शकांसाठी असलेला हा भारतातला पहिला लघुपट महोत्सव आहे. 

किशोर अवघ्या ३५ वर्षांचे असून, चित्रपट व पत्रकारिता या क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘विस्फी’बद्दल त्यांनी किशोर अर्जुनेमांडलेल्या भावना प्रेरणादायी आहेत. ‘सिनेमा न आवडणारा किंवा सिनेमावर प्रेम न करणारा माणूस भारतात मिळणं विरळच. मागील अनेक वर्षांपासून चित्रपट या विषयाशी जोडला गेलो असल्याने एखादा चित्रपट महोत्सव सुरू करावा असं डोक्यात होतं. परंतु योग्य संधी मिळत नव्हती. एलिसच्या बाबतीत वाचल्यानंतर मला एक नवी कल्पना आणि थीम मिळाली, ती महिला दिग्दर्शकांच्या लघूपट महोत्सवाची. त्यातच मागील वर्षी एलिसचा ५०वा स्मृतिदिन होता. तेव्हा हा योगायोग साधून ‘विस्फी’ सुरू केला. एलिस ही आमची आणि पर्यायानं जगातल्या अनेक महिला चित्रपटकारांची प्रेरणा ठरली. भारतात ‘विस्फी’च्या आधी केवळ महिलांसाठीअसा एकही लघुपट महोत्सव नव्हता. ‘विस्फी’च्या निमित्तानं या सगळ्या महिला दिग्दर्शकांना एक हक्काचं व्यासपीठ आम्ही देऊ शकतोय याचा विशेष आनंद वाटतो,’ अशा भावना किशोर यांनी व्यक्त केल्या. 

चित्रपटाविषयी तळमळीनं काहीतरी करू पाहणारे किशोरसारखे तरुण पाहिले, की भारतात अजूनही इतिहास घडवला जाऊ शकतो, यावर विश्वास बसू लागतो. या महोत्सवाच्या रूपाने ‘विस्फी’नं असाही इतिहास रचला आहे आणि पर्यायानं किशोरनंसुद्धा.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/LZVBBY
Similar Posts
‘इफ्फी’च्या निमित्ताने... गोव्यातील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात ‘इफ्फी’ २१ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. २८ नोव्हेंबरपर्यंत होणाऱ्या या महोत्सवात ६८ देशांमधील २१२ चित्रपट दाखवले जाणार आहेत. त्यात ४५ भारतीय चित्रपटांचा समावेश आहे. २०१८ हे या महोत्सवाचे ४९वे वर्ष आहे. त्या निमित्ताने, ‘इफ्फी’ची सुरुवात कशी झाली, या महोत्सवातील
‘३ फेसेस’च्या निमित्ताने... 'इरानियन' किंवा 'पर्शियन' सिनेमानं अगदी सुरुवातीपासूनच सिनेमात नाविन्याची कास धरली होती. परंतु दुर्दैवानं उर्वरित जगात मानाचा ठरलेला पर्शियन सिनेमा त्याच्या मायभूमीत मात्र रुजला नाही. तिथे त्याला फार काळ आश्रय मिळाला नाही. अशा प्रतिकुलतेतही तग धरून राहिलेल्या दिग्दर्शकांमध्ये घेतलं जाणारं नाव म्हणजे जफर पनाही
दिवस खारीचा वाटा उचलायचे! गुजरातमधील मातृभाषा अभियान या चळवळीचे प्रणेते पुरुषोत्तम पटेल यांचे आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनाच्या पूर्वसंध्येला निधन झाले. गुजराती भाषेच्या संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या या चळवळीबद्दल...
टीसीएस, पेट्रोलियम कंपन्यांचे शेअर्स घेण्यायोग्य शेअर बाजारात सध्या ‘टीसीएस’च्या उत्तम कामगिरीमुळे संगणन कंपन्यांच्या शेअर्सला अनुकूल वातावरण आहे. पेट्रोलचे भाव चढे राहणार असल्याने पेट्रोलियम कंपन्याही तेजीत आहेत. त्यामुळे सध्या ‘टीसीएस’सह पेट्रोलियम कंपन्या आणि ‘मँगनीज ओअर इंडिया’चे शेअर्स खरेदीसाठी उत्तम आहेत. याविषयी सविस्तर माहिती घेऊ या ‘समृद्धीची वाट’ या सदरात

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language